छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्ह्यातील गर्भवती महिलांनी मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी सेविका समवेत संपर्क साधून योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगल पांचाळ यांनी केले आहे.
गर्भवती महिलांना प्रधानमंत्री मातृयोजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये रक्कम दोन हफ्यांमध्ये तर दुसऱ्या अपत्यासाठी मुलगी झाल्यास मुलीच्या नावावर जन्मानंतर एकाच टप्प्यात ६ रुपयाचा लाभआधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात डीबीटीद्वारे जमा केला जातो. पहिल्या हप्त्यासाठी आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी किंवा शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत किमान एक प्रसूती तपासणी झालेली असावी,
तसेच दुसऱ्या हप्त्यासाठी बाळाची जन्म नोंदणी प्रमाणपत्र बालकाच्या बीसीजी ओपीव्हीझिरो, ओपीव्ही तीन मात्रा, अँटॅलिटी लसीच्या तीन मात्रा अथवा समतुल्य पर्याय लसीकरण प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे.
गर्भधारणेपासून जवळच्या आरोग्य केंद्रात गर्भ नोंदणी माता व बालसंगोपन कार्ड, आरसीएच नंबर मोबाईल नंबर, लाभार्थीचे आधार कार्ड, लाभार्थीचे बँक खाते पोस्ट ऑफिस खाते, जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे. आजतागायत जिल्ह्यातील गर्भवती महिलांनी मोठ्या संख्येनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
लाभार्थी महिलांच्या बँकेतील खात्यावर प्रत्यक्ष लाभाची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. गर्भवती महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी डॉ. मंगल पांचाळ यांनी केले आहे.














